वाशिम : लॉकडाऊन काळात आकारण्यात आलेले विद्युत देयक माफ करण्यात यावे, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे २० नोव्हेंबर रोजी वाशिम येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. विद्युत देयके वारेमाप येत असल्याने शेतकºयांसह सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. यंदा कोरोनाकाळात मीटर रिडींग न घेताच अनेकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके आकारण्यात आली. वीज दर कपात तसेच लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ करण्याच्या मागणीसाठी यापूर्वीदेखील विविध टप्प्यात आंदोलने करण्यात आली; परंतू याकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा २० नोव्हेंंबर रोजी आम आदमी पार्टीतर्फे स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. २०० युनिटपर्यंत वीज देयक माफ करण्यात यावे, वीज दर कपात करावी या मागणीसाठी यापुढेही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पदाधिकाºयांनी दिला. यावेळी जिल्हा संयोजक अॅड. गजानन मोरे, जिल्हा सचिव विनोद पट्टेबहादुर, दिपक कव्हर, देवा सारसकर, सागर इंगोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वीज देयक माफ करण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे घंटानाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 6:16 PM