वाशिम : १६ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणातील अनसिंग (ता.मालेगाव) येथील फरार आरोपीस ३० डिसेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले. तरीही न्यायालयात हजर न झाल्यास संबंधित आरोपीची मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
मालेगाव तालुक्यातील अनसिंग येथील गजानन दत्तराव घोळवे (वय ५८) या आरोपीकडे दळण दळण्याची चक्की असून, या चक्कीवर फिर्यादीची १६ वर्षीय पुतणी दळण दळण्यासाठी ८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास गेली होती. आरोपीने पीडित मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त झाल्याने मालेगाव पोलिस स्टेशनला भादंवी कलम ३५४ व इतर कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आरोपी फरार असून, अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. अ
टक टाळण्यासाठी आरोपी फरार राहत असल्याने विद्यमान न्यायालयाकडून पकड वॉरंट घेण्यात आले. परंतु, आरोपी फरार असल्याने पकड वॉरंटची अंमलबजावणी होऊ शकली नाही. विनयभंगाच्या गुन्ह्यातील हा आरोपी फरार झाल्याने व वॉरंटची बजावणी चुकविण्यासाठी गुप्तपणे वावरत असल्याने अतिरिक्त व सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये आरोपीस कलम ८२ सीआरपीसी अन्वये ३० डिसेंबर २०२३ पर्यंत व्यक्तिश: न्यायालयात हजर राहण्याबाबत फर्माविण्यात आले.
न्यायालयात हजर न झाल्यास आरोपीची मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी करीत आहेत. सत्र न्यायालयात सरकारी वकिल अभिजित व्यवहारे काम पाहत आहेत.