संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शाळेतील उपस्थिती वाढावी, शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे आदी उद्देशातून वाशिमसह राज्यातील वर्ग पहिली ते चौथीमधील एस. सी., भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येतो. गतवर्षी शाळा बंदच असल्याने उपस्थिती भत्ता मिळाला नाही. यंदाही प्राथमिक शाळा बंदच असल्याने उपस्थिती भत्ता मिळणार की नाही? यावर प्रश्नचिन्हच आहे.
राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्यरेषेखालील पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींना प्रतिदिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. शाळेत ७५ टक्के उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थिनींना याचा लाभ देण्यात येतो. सन २०२०-२१मध्ये कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच असल्याने वाशिमसह राज्यातील मागास प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता मिळू शकला नाही. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १२ हजार ५०० विद्यार्थीनींचादेखील समावेश आहे. यंदादेखील प्राथमिक शाळा बंदच आहेत. शैक्षणिक वर्षाचे अडीच महिने उलटून गेल्यानंतरही उपस्थिती भत्त्याबाबत शासनस्तरावरून कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता मिळणार की नाही? याबाबत संभ्रमच आहे.
.....
रक्कम छोटी; पण आनंद मोठा!
शाळेत गेलो तर उपस्थिती भत्त्याची रक्कम मिळते, या आशेपोटी ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थिनींना शाळेची गोडी लागत आहे. प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता दिला जातो. ही रक्कम खूप छोटी असली तरी त्यामधून दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना मिळणारा आनंद खूप मोठा आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या उपस्थिती भत्त्यावरच गंडांतर का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
.........
कोट
गतवर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शासनाकडून उपस्थिती भत्त्याची रक्कम प्राप्त झाली नाही. उपस्थिती भत्त्याबाबत अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- गजानन डाबेराव
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम