वाशिम - आजीच्या नावे असलेली शेती बक्षिस पत्राद्वारे नावे करुन फेरफारला त्याबाबत नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजाराचा लाच स्वीकारताना वडगाव (ता.मानोरा) सजाचे तलाठी आशिष सावंगेकर यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आमकिन्ही येथे १४ डिसेंबर रोजी करण्यात आली.
तक्रारदाराने एसीबीकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आजीचे नावे असलेली ५ एकर शेती बक्षिसपत्राव्दारे आजीचा पणतू यांचे नावे करण्यासाठी बक्षिस पत्र करून त्याची फेरफार ला नोंद केली जात नव्हती. त्यासाठी तलाठी सावंगेकर यांनी तक्रारदारांकडे ५० हजारांची मागणी केली. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने १३ डिसेंबर रोजी पडताळणी केली. यादरम्यान ५० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती ४१ हजार स्विकारण्यास सहमती दिली. त्यातील ३० हजार अगोदर आणि त्यानंतर उर्वरित ११ हजार नोंद घेतल्यानंतर देण्याचे ठरले.
१४ डिसेंबर रोजी सापळा कार्यवाही दरम्यान ३० हजार रुपयांची लाच रक्कम तलाठी आशिष सावंगेकर यांनी बळीराम नगर आमकिन्ही येथे स्वीकारली. याचवेळी तलाठी यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून लाच रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी तलाठी सावंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सापळा व तपास अधिकारी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस अंमलदार नितिन टवलारकर, विनोद अवगळे, विनोद मारकंडे, दुर्गादास जाधव, रंविद्र घरत, योगेश खोटे यांच्या पथकाने केली.
पंधरा दिवसांत तिसरी कारवाई
जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ कारवाया केल्या आहेत. यामध्ये पंधरा दिवसांतच तीन कारवाया झाल्या आहेत.