या वेळी जिल्हाधिकारी श्ण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्र व हॉटस्पॉट असलेल्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करून तेथील बाधितांचा शोध घ्यावा; तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पुरेसे बेड्स, औषधे उपलब्ध ठेवावीत. प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्ण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात सद्य:स्थितीत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे. तसेच लोकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचवून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्रावर घेऊन येण्यासाठी ग्रामस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील.
पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर करण्यात येत असलेल्या कारवायांची माहिती दिली.