राज्य शासनाने २ ऑक्टोबर ते ३१ मार्च या काळात ग्रामपंचायतस्तरावर माझी वसुंधरा अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यात वाशिम जिल्ह्यातील शिरपूर व अनसिंग ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीचे प्रशासक व्ही. टी. शिंदे, ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे व गावकरी धडपड करीत आहेत. या अभियानांतर्गत मानवी स्वभावातील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे जनमानसात पर्यावरण संरक्षणाची ओढ निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, गावात पाचशे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शिवाय पाण्याचा अपव्यय टाळणे, वीज (ऊर्जा) बचत करणे, नाली सफाईसह स्वच्छताविषयक कामावर जोर दिला जात आहे. तसेच यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जनतेने नालीमध्ये केर कचरा टाकू नये, पाण्याचा अपव्यय करू नये, प्लास्टिकचा वापर टाळावा, स्वच्छता राखावी व कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन ध्वनीप्रक्षेपकाद्वारे गावकऱ्यांना करण्यात आले. येत्या सोमवारी या अभियानासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, हे व्यापारी मंडळ प्रतिनिधी, शाळांचे मुख्याध्यापक, पेट्रोलपंप प्रतिनिधी, आरोग्य व महिला बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी, ऑटो चालक संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.
-----
त्रयस्थ संस्थेमार्फत मुल्यांकन
माझी वसुंधरा अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यात शिरपूर आणि अनसिंग या दोन ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. माझी वसुंधरा या अभियानासंदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ग्रामपंचायतींनी केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन त्रयस्थ संस्थेद्वारे केले जात असून, या मुल्यांकनानंतर जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच ५ जून रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.