लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहराला वर्षाकाठी किमान सात दशलक्ष घनमीटर पिण्याचे पाणी लागते. मात्र, एकबुर्जी जलाशयात आज रोजी केवळ १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपास पाणीसाठा शिल्लक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नगर परिषदेने १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, शहरवासीयांना आतापासूनच भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाची सरासरी टक्केवारी ५0 टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. असे असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून, वाशिम शहर तथा परिसरात तर फारच कमी पर्जन्यमान झाले आहे. परिणामी, अर्धाअधिक पावसाळा उलटूनही वाशिमला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी जलाशयात अपेक्षित पाणीसाठा होऊच शकला नाही. त्यामुळे आजमितीस या जलाशयात उणापुरा १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक असून, १0 दिवसाआड पाणीपुरवठा केला, तरी तो आगामी तीन महिने अर्थात डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन जुमडा बॅरेजमध्ये असलेला चार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पाइपलाइनद्वारे एकबुर्जी जलाशयात खेचून आणण्यासाठी विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाच कोटी रुपयांची मागणी नोंदविलेली आहे. नगर परिषद स्तरावरूनही विद्यमान नगराध्यक्ष अशोक हेडा, पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे यांचे यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत; मात्र ही बाब खर्चिक असण्यासोबतच वेळखाऊ असल्याने विद्यमान स्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याशिवाय इतर कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी दुष्काळसदृश परिस्थिती आणि एकबुर्जी जलाशयात शिल्लक असलेला नगण्य पाणीसाठा, या बाबी लक्षात घेऊन पाण्याचा अनावश्यक वापर तथा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले जात आहे.
यंदा अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयातील पाणी साठय़ाची स्थिती चिंताजनक झाली आहे. असे असले तरी त्यावर मात करण्याचे सर्वंकष प्रयत्न नगर परिषदेकडून सुरू असून, वेळप्रसंगी मृत जलसाठाही शहरवासीयांची तहान भागवू शकतो. जुमडा बॅरेजमधून पाणी मिळाल्यास सोयीचे होणार आहे. - अशोक हेडा, नगराध्यक्ष, वाशिम
एकबुर्जीचा घटलेला जलसाठा आणि यंदाची दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याने आतापासूनच १0 दिवसाआड पाणी पुरविले जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. - राहुल तुपसांडे, पाणीपुरवठा सभापती, वाशिम