मेडशी: कठडे नसलेल्या पुलामुळे अंदाज चुकल्याने काश्मिरमधील श्रीनगर येथून सफरचंद घेऊन हैद्राबादकडे जात असलेल्या ट्रकचा अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावरअपघात झाला. यात ट्रकचा चुराडा होऊन सफरचंदासह लाखोंचे नुकसान झाले आणि चालकाला किरकोळ दुखापत झाली. ही घटना बुधवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील मेडशीनजिक घडली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार श्रीनगर येथून सफरचंद घेऊन हैद्राबादकडे जात असलेला आर.जे.- १४, जी.जी. ७६९९ क्रमाकांचा अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मेडशीनजिक असलेल्या पुलावर पोहोचला. या पुलास कठडे नसल्याने चालकाला अंदाज घेता आला नाही आणि समोरून येत असलेल्या वाहनाला मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करताना हा ट्रक थेट खाली कोसळला. यामध्ये ट्रकचा चुराडा झालाच शिवाय लाखो रुपयांच्या सफरचंदांचे नुकसान झाले. सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत होण्यापलिकडे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. जिल्ह्यातील अनेक पुलांची अवस्था अशीच असल्याने संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसत आहे.