या घटनेमध्ये आरोपी बादल शिका चव्हाण रा.अंत्रज, ता.खामगाव याने पोकलॅण्ड मशीन खरेदी करण्यासाठी गणेश बोराडे यांना १६ लाख रुपये घेऊन पांगरखेडा येथे बोलविले होते. १५ सप्टेंबरच्या रात्री बोराडे हे १६ लाख रुपये घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांगरखेडा येथे आले होते. अगोदर रमेश गयानू चव्हाण यांच्या घरी चहा पाणी करण्यात आले. नंतर पोकलँड घेण्यासाठी आणलेले पैसे कुठे असल्याची माहिती घेण्यात आली. बोराडे यांनी पैसे गाडीमध्ये असल्याचे सांगितल्याने आरोपींनी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाइल हिरावून घेतला व जबरदस्तीने गाडीतील १६ लाख रुपये लुटले. याप्रकरणी बोराडे यांच्या फिर्यादीवरून १७ सप्टेंबर रोजी कलम ३९५ नुसार आरोपी बादल शिका चव्हाण, रमेश गयानू चव्हाण, नरेंद्र रमेश चव्हाण, विजेंद्र रमेश चव्हाण, एका अल्पवयीन व एका अनोळखी असे एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी रमेश गयानू चव्हाण, विजेंद्र रमेश चव्हाण या आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली तसेच गुन्ह्यातील एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींना मालेगाव न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाच दिवसात फरार आरोपींना पकडण्यात व मुद्देमाल वसूल करण्यात पोलिसांना यश मिळते का? याकडे लक्ष लागून आहे.
१६ लाख लुटप्रकरणी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:41 AM