लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : करंजी (ता. मालेगाव) येथील विश्वनाथ लहाने यांचा सन २०१२ मध्ये खून झाला होता. या खटल्याची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी रमेश जिजेबा लहाने यास १३ जून रोजी अटक केली. विश्वनाथ जिजेबा लहाने (वय ५०) यांची हत्या रमेश जिजेबा लहाने याने सन २०१२ मध्ये केली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी रमेश लहानेविरुद्ध कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने लहाने यास फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध रमेश लहाने याने उच्च न्यायालयात शिक्षा रद्द करण्यासाठी अपिल केले होते. त्यावेळी उच्च न्यायालयाने रमेश लहाने याची निर्दोष मुक्तता केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान रमेश लहाने याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी त्याचे न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने लहाने यास हजर करण्यासाठी वारंवार समन्स पाठवले; परंतु तो गेल्या अनेक महिन्यांपासून पसार होता. त्याने आपला पेहराव बदलल्यामुळे ओळख पटणे कठीण झाले होते. अशातही गुप्त माहितीवरून ठाणेदार अंबुलकर यांच्या विशेष पथकाने लहाने यास १३ जून रोजी शिताफिने अटक केली.