जिल्ह्यात या वर्षी एकूण ४ लाख ६ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनचा ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक पेरा होणार असल्याचे गृहीत धरून कृषी विभागाने पुरेशा प्रमाणात खत, बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. महाबीजच्या बियाण्यांची काही ठिकाणी टंचाई जाणवत आहे; मात्र येत्या काही दिवसांत हा प्रश्नही निकाली निघणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.
दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांना पैशांची चणचण भासू नये, यासाठी प्रशासनाने १०२५ कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक निर्बंध लादण्यात आले; मात्र अशाही स्थिती बँकांनी शेतकऱ्यांना अपेक्षित साथ दिली. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याने पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास पोहणे शक्य झाले. ३१ मेअखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण झाली होती, अशी माहिती मिळाली.
.....................
डीएपी खताचा तुटवडा कायम
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी प्रामुख्याने डीएपी गोदावरी या खताला पहिली पसंती देतात; मात्र यंदा याच खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. इतर सुमारे १३०० मे. टन. मिश्र खते उपलब्ध आहेत; मात्र शेतकऱ्यांना केवळ डीएपी गोदावरीच हवे आहे. यामुळे कृषी विभागासह कृषी सेवा केंद्रांचीही डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, कच्च्या मालाचा पुरवठा ठप्प असल्याने किमान आणखी काही दिवस तरी डीएपी गोदावरी खत जिल्ह्याला उपलब्ध होणार नसल्याची माहिती मिळाली.
..................
मान्सून लांबला तरी चिंता नको
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून काही दिवस लांबणार आहे; मात्र त्याने चिंता करण्याचे कुठलेच कारण नाही. यासह सध्या अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाच्या भरवशावर कुठल्याच शेतकऱ्याने पेरणीची घाई करू नये. मान्सूनचे आगमन झाल्यानंतरच पेरणीस सुरुवात करावी. यासह उगवणक्षमता तपासून घरचेच बियाणे पेरण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.