- निनाद देशमुख
रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. विहिर अधिग्रहणाच्या ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने अद्याप ३९ प्रस्ताव धूळखात आहेत. दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
गतवर्षी अपुºया पावसामुळे यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ५७८ गावांत पाणीटंचाई आहे. रिसोड तालुक्यातील ७५ पेक्षा जास्त गावांत पाणीटंचाई तिव्र बनली आहे. पाणीटंचाईच्या निवारणासाठी विहिर व बोअर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केले आहे तर दुसरीकडे ग्राम पंचायत स्तरावरून पाठविलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या तिव्रतेत अधिकच वाढ होत असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतींकडून ४५ बोअर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले ओत. त्यापैकी केवळ सहा प्रस्ताव मंजूर झाले असून, विहिर अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये धोडप बु. व वाकद येथे प्रत्येकी दोन, वडजी, कन्हेरी या गावांचा समावेश आहे. दोन टँकर प्रस्ताव असून, त्याला मंजूरातही मिळाली. यामध्ये कुºहा व करंजी गरड या दोन गावांचा समावेश आहे.
तालुक्यातील जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली आहे. त्यातही प्रस्तावित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळावर मात म्हणून तसेच पाणी उपलब्धतेसंदर्भात तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ठ गावातही तिव्र पाणीटंचाई असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्चही यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागवू शकला नाही, ही शोकांतिका आहे.