वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेथ अनालायझर’चा सावधगिरीने वापर करीत शहर वाहतूक शाखेने २०२० मध्ये ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी ६७ तळीरामांवर दंडात्मक कारवाई केली.
मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने एप्रिल ते मे या दोन महिन्यात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता मिळत गेल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. दरम्यान, जुलै, ऑगस्ट महिन्यापासून देशी, विदेशी दारूविक्रीची दुकानेही सुरू झाल्याने तळीरामांना चांगलाच दिलासा मिळाला. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वाहन चालविणाऱ्या तळीरामांविरुद्ध कारवाई करताना ‘ब्रेथ अनालायझर’चा (मद्यपानाच्या प्रमाणाची चाचणी घेणारे यंत्र) वापर शक्यतोवर टाळावा, अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून मिळाल्या होत्या. वाशिम शहर वाहतूक शाखेने ब्रेथ अनालायझरचा वापर करताना आवश्यक ती दक्षता घेत (एका चाचणीनंतर यंत्रातील नळी बदलणे) गत तीन महिन्यांत ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी तळीरामांवर कारवाई केली. २०१९ मध्ये ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी केवळ ३१ जणांवर कारवाई झाली होती. २०२० मध्ये ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी ६७ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे वाशिम शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले.
०००
कोट
कोरोनाकाळात ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी ब्रेथ अनालायझर’चा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. एका चाचणीनंतर यंत्रातील नळी बदलण्यात आली. २०२० मध्ये ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी ६७ जणांवर कारवाई करण्यात आली.
- नागेश मोहोड
शहर वाहतूक शाखा प्रमुख, वाशिम
००००
कोरोनाकाळात वाढली कारवाई
२०१९ मध्ये ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी वाशिम शहर वाहतूक शाखेने केवळ ३१ जणांवर कारवाई केली होती. २०२० मध्ये कोरोनाकाळात ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’प्रकरणी ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. अन्य जिल्ह्यात कोरोनाच्या काळात ब्रेथ अॅनालायझरचा वापर जवळपास बंद केल्याने कारवाईचा आलेख खालावला. वाशिम शहर वाहतूक शाखेने मात्र सावधगिरीने ब्रेथ अॅनालायझरचा वापर करून तळीरामांवर कारवाई केली.
००
कोरोनाकाळात दारूचा खप घटला
२०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नसल्याने देशी, विदेशी दारूचा खप वाढला होता. मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने जवळपास तीन महिने मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये दारू विक्रीचा खप घटला, असे राज्य उत्पादन शुल्क विभाग, वाशिमच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
०००