वाशिम, दि. २१- संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून डिसेंबर महिन्यात तयार होणारा पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा यावर्षी जानेवारीच्या पंधरवड्यातही अंतिम झाला नाही. पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंब झाल्याने आता हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांच्या दरबारात ठेवला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.गत तीन वर्षांपासून जिल्हा कोरड्या दुष्काळाला सामोरे गेला आहे. यापूर्वीच्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक गावांनी पाण्याचे चटके सोसले आहेत. २0१६ मध्ये बर्यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी पाणीटंचाईची तीव्रताही कमी राहिल, असा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे. नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उ पाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. साधारणत: डिसेंबर महिन्यात या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाते. त्यानुसार टंचाईग्रस्त गावात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी २0 जानेवारी उजाडला असतानाही, पाणीटंचाई कृती आराखडा चर्चेसाठी जिल्हाधिकार्यांच्या दरबारात पोहोचला नाही, अशी माहिती आहे. पंचायत समिती स्तरावरूनच दिरंगाई झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकार्यांच्या दरबारात मंजुरीसाठी हा आराखडा ठेवला जाणार असल्याचे सूत्र आहे. १५ दिवसांपूर्वी मालेगाव पंचायत समिती येथे पाणीटंचाईवरूनच महिलांनी बीडीओ व ग्रामसेवकाच्या दिशेने बांगड्या फेकून दप्तरदिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला होता.
कृती आराखड्यास दिरंगाई
By admin | Published: January 22, 2017 2:57 AM