वाशिम : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ९ जुलै २०१८ रोजी सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या होत्या. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने २९ आॅगस्ट रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढाव्या, त्यांच्या व्यथा जाणून लवकरात लवकर न्याय मिळावा, यादृष्टीने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये सुस्पष्टता येण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हा प्रशासनाला या धोरणाच्या अनुषंगाने योग्य ती अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी प्राप्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करावा, असे निर्देश देऊन समस्यांचा निपटारा करण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचे बजावले आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, कार्यालये, समाज मंदिरे, विरंगुळा केंद्रे येथील जागा ठरावीक दिवशी ठरावीक वेळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची आस्थापूर्वक सोडवणूक होण्यासाठी व विविध विभागामार्फत राबविण्याच्या योजनांचे संनियंत्रण व्हावे, याकरिता सामाजिक न्याय विभाग व सर्व शासकीय विभागांनी समन्वयातून ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यावा, अशा सूचना जिल्हास्तरीय सामाजिक न्याय विभागासह जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आल्या.शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा केला जाईल, असे वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरुवारी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:48 PM