पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएसआय संतोष आघाव हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान सहकाऱ्यांसोबत तपासकामी जात असताना शहराबाहेरील वरुड रोडवरील मूकबधिर शाळेच्या मागील बाजूला खुल्या जागेत एमएच ३६ एए ४३५१ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमधून काही इसम रेती खाली करताना दिसून आले. तेथे हजर इसमाचे नाव, गाव विचारले असता, त्याने विशाल गोविद शिंदे (३६), व्यवसाय ट्रक ड्रायव्हर (रा. हनुमान तलाव, तुमसर, जि. भंडारा) असे सांगितले. रॉयल्टी व गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता मध्य प्रदेश गौण खनिज विभागाची रॉयल्टी दाखविली. रेतीसाठा व कागदपत्रे याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. या ट्रकच्या मागील बाजूस पोलिसांना एमएच ०४ एस ७१३२ क्रमाकांचे एक टाटा ४०७ वाहन दिसले. पाहणी केली असता त्यामध्येसुद्धा रेती भरलेली दिसून आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, अंकुश वडतकर, कर्मचारी जितेंद्र ठाकरे, उमेश ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.
०००००००
...तर नियमानुसार कारवाई
टाटा वाहनचालक संदीप विष्णू वाडवे (२४, रा. स्वाशीन, ता. मंगरुळपीर) यास रॉयल्टीबाबत विचारणा केली असता रेतीची रॉयल्टी नसल्याने व वाहनाच्या कागदपत्रांची विचारणा केली असता नसल्याचे सांगितल्यामुळे दोन्ही वाहने पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव यांनी पोलीस ठाण्यात लावली तसेच तहसीलदार यांना याबाबत माहिती दिली आहे. दोषी आढळून येणाऱ्या वाहनावर नियमानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला.