वाशिम : शहरातील पाटणी चाैकामध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्यांसह मास्कचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांवर २ एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गावातील अरुंद रस्त्यामुळे त्रास
अनसिंग : परिसरातील गावांमधील अरुंद रस्त्यांमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुणाच्या घरासमोर वाहन उभे केल्यानंतर वाद होऊन त्याचे रूपांतर भांडणात होत असल्याने गावातील किमान मुख्य रस्त्याचे तरी रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
रस्त्यात कचरा; दुर्गंधीमुळे गैरसोय
कामरगाव : परिसरात असलेले हॉटेल व्यावसायिक कचरा, शिल्लक राहिलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकून देत असल्याने दुर्गंधी सुटत आहे. येथे वराहांचा मुक्त संचार राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबधितांनी याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
धनज गावात रस्त्यांवर घाणच घाण
धनज : गावात रस्त्यांवर घाण साचल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही नागरिक रस्त्यांवरच कचरा टाकून देत असल्याने हा कचरा हवेने उडून सर्वत्र पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या घरासमोर कचरा येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. संबधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.