लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रेशन कार्ड बनवून देण्याच्या नावाखाली लाभार्थींकडून पैसे उकळणारी टोळी रिसोड तहसिल कार्यालय परिसरात सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. लाभार्थींची आर्थिक पिळवणूक करणाºया या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टिने पुरवठा विभागाने पाऊल उचलले आहे.रेशन कार्ड बनवून देणे व विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो रुपये उकळण्याचे प्रकार सध्या रिसोड तहसील कार्यालयाच्या आवारात विविध दलाला व काही वाइंडरकडून सुरू आहे. रेशन कार्ड व इतर योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी तहसील कार्यालयात येतात. प्रस्ताव तयार करणे व अन्य सोपस्कार हे अधिकृत असलेल्या सेतू कार्यालयामार्फत होणे अपेक्षीत आहे. मात्र, तहसिल कार्यालय परिसरात काही दलाल लाभार्थींना गाठून आमिष दाखवत तुमची काम करून देतो या नावाखाली आर्थिक लुट करीत आहेत. २१ आॅगस्ट रोजी असाच एक प्रकार समोर आला. शहरातील गजानन नगर येथे राहणाºया एका महिलेला तहसील कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या एका वाइंडरने तीन ते साडेतीन हजार रुपये घेऊन रेशन कार्ड बनवून दिले. सदर महिला ही सदर रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्याने तहसील कार्यालयात पोहोचली असता, तेथे उपस्थित पुरवठा निरीक्षण अधिकारी सय्यद एहसानोद्दीन यांच्या लक्षात सदर बाब आली. त्या महिलेची चौकशी केली असता, एका वार्इंडरने साडेतीन हजार रुपये घेऊन रेशन कार्ड बनवून दिल्याचे सांगितले. त्यावर महिलेची फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली. माफक शुल्क भरून रेशन कार्ड बनत असूनही दलाल गोरगरीब लाभार्थींची फसवणूक करीत असल्याची बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सदर महिलेने रिसोड पोलीस स्टेशन गाठून वार्इंडरच्या विरोधात तक्रार दिली. तुर्तास पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.कोणत्याही योजनेचा लाभ किंवा रेशन कार्ड बनवून घ्यायचे किंवा विभक्त करायचे असेल यासाठी थेट तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी व अधिकाºयांशी संपर्क करण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले.
घरकुल योजनेच्या लाभासाठी रेशन कार्डची कोणतीही अट नाही. यासाठी आग्रह करू नये. घरकुलासंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाºयांना यापूर्वी रितसर पत्रही देण्यात आलेले आहे. मात्र लाभ मिळवून देण्याच्या नावावर काही दलाल अशा प्रकारच्या अफवा पसरवित असतील. संबंधित लाभार्थींनी दलालांच्या अशा अफवांना बळी पडू नये. रेशन कार्डसंबंधी कोणत्याही प्रकारचे काम असल्यास थेट तहसील कार्यालयात संपर्क साधावा.- सय्यद एहसानोद्दीननायब तहसिलदार, पुरवठा विभाग.