मंगरूळपीर : आज कुटुंबातील नात्याची वीण उसवली आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे; तसेच पर्यावरणातील झाडांचा ऱ्हास झाल्यामुळे सबंध जगावर तापमानवाढीचे संकट ओढवले आहे. घर, कुटुंब, पर्यावरण माणसाचे अस्तित्व जोपासतात; पण कृतघ्न माणूस हे सारे विसरत गेला आहे. या अनुषंगाने येथील पर्यावरणाच्या कृतिशील कार्यकर्त्यां व अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांनी ‘नाती, कुटुंब जोडा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळा’ असे युवा पिढीच्या सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीच्या भावनेला हात घालून कृतिप्रवण बनविणारे अभिनव अभियान ११ जुलैपासून सुरू केले.
मृण्मयी यांनी सर्वप्रथम कल्पनानगर, नामदेवनगर, सहकार वसाहत या परिसरात वृक्षसंगोपनाच्या अटीवर नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार रस्त्यावर दुतर्फा कडुनिंब, वड, जांभूळ, पिंपळ, करंजी, बेल, रिठा, बांबू, आवळा, चिंच, इ. वृक्षांचे घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रोपण करून घेतले. यात अनेक आजी-आजोबानी सहभाग घेतला होता. याशिवाय आजी-आजोबांचे नाते पर्यावरणाच्या माध्यमातून वृद्धिंगत व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आप्तेष्ट व मित्रपरिवार यांच्यापैकी २५ शेतमालकांच्या शेतावर जाऊन त्यांच्या कुटुंबातील आजी-आजोबांच्या हस्ते, मुले व नातू यांच्या उपस्थितीत प्रत्येक शेतात पाच आंब्यांच्या मातृवृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण मित्र कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांनी झुणका-भाकरीचे भोजन दिल्याने या उपक्रमाला भावस्पर्शी सोहळ्याचे स्वरूप आले. मृण्मयी हातोलकरांना या उपक्रमासाठी पर्यावरण मित्रमंडळाचे सतीश बंनोरे, शरद येवले, राजेश दबडे, संजय तेलंग, साहिल अबिल्डिंगे, अभिजित हातोलकर, सम्यक बनसोड, राजेंद्र जाधव, ईश्वर परंडे, मनीष राजूरकर, राजेंद्र धोपे, दिलीप पाटील, पानबिहाडे, आदींचे सहकार्य लाभले.