वाशिम - तालुक्यातील उमरा (शम.) येथे श्री अवलीया बाबा यांचा जन्मशताब्दी सोहळयानिमित्त ४ एप्रिलपासून व्यसनमुक्ती संगीतमय कथेला सुरूवात झाली. व्यसनमुक्तीसंदर्भात असा उपक्रम घेऊन उमरावासियांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला.व्यसनमुक्तीसम्राट हभप मधुकर महाराज खोडे इसापूरकर यांचे वाणीमधून कथेला प्रारंभ झाला. सलग पाच दिवस चालणाऱ्या या संगीतमय भागवत कथेसोबतच रोज रात्री साडेआठ वाजता नामवंत किर्तनकारांची हरिकिर्तने होणार आहेत. गावाच्या स्मशानभूमीचे नंदनवन करणाऱ्या संत अवलिया बाबांच्या वास्तव्यामुळे उमरा गावाचा कायापालट होत आहे. सुरुवातीपासून स्मशानभूमित राहणाऱ्या अवलीया बाबांवर गावकऱ्यांची नितांत श्रध्दा आहे. बाबांवरील श्रध्देपोटीच गावाचा विकास होवून गावाला दोन धरणे झाल्याचे सर्वच गावकरी मानतात. त्यामुळेच हा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्याकरीता संपूर्ण ग्रामवासी सरसावले आणि प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून या सोहळ्याला सुरूवात झाली. गाव व्यवसनमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला जात आहे, असे अवलिया बाबा संस्थानचे अध्यक्ष बालकिसन गट्टाणी, सुभाष कव्हर व संतोष खडसे यांनी स्पष्ट केले.
उमरा येथे व्यसनमुक्ती संगीतमय कथा
By admin | Published: April 04, 2017 3:17 PM