लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर लागू असलेली संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’मुळे पुरेशा प्रमाणात खत आणि बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी मे अखेर हा प्रश्न पूर्णत: निकाली निघणार असून शेतकºयांनी काळजी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बडगर यांनी केले.जिल्ह्यात ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. त्यात २ लाख ९६ हजार ६० हेक्टर एवढे क्षेत्र सोयाबिन पिकाखालील असून साधारणत: ७७ हजार क्विंटल बियाणे त्यासाठी आवश्यक आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. विशेषत: बहुतांश शेतकरी घरचेच बियाणे वापरण्याचे नियोजन करित असल्याने बियाण्याची विशेष अडचण जाणवणार नसल्याची स्थिती आहे.यंदाच्या हंगामात आतापर्यंत महाबिजकडून ४८०० क्विंटल व खासगी कंपण्यांकडून २१९२ असे एकंदरित ६ हजार ९९२ क्विंटल बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध झाले आहे. मे महिन्याअखेर आवश्यक बियाणे साठा विक्रीस उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ५० हजार मे.टन. रासायनिक खत आवश्यक असून पुणे कृषी आयुक्तालयाकडून ५६ हजार २९० मे.टन. खत साठा मंजूर झालेला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध स्वरूपातील रासायनिक खतांचा २८ हजार २२८ मे.टन. एवढा साठा उपलब्ध असून मे अखेर १४७० मे.टन. युरिया उपलब्ध होणार आहे. तसेच डी.ए.पी. २९६० मे.टन., एम.ओ.पी. १२३० मे.टन., एन.पी.के. ४२२० मे.टन. खत शेतकºयांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकºयांनी काळजी न करता अधिकृत विक्रेत्याकडूनच रासायनिक खत व बियाणे खरेदी करावी. त्याची पक्की पावती जवळ ठेवावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाºयांनी केले. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार, कापूस बीटी बियाणे विक्रीस सद्या मनाई करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्रांना तशा सूचना देण्यात आल्या असून कुणीही बीटी बियाण्याची विक्री करू नये, असे कृषी विकास अधिकाºयांनी कळविले.
मे अखेर बियाणे, खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:19 PM