वंचित बहुजन आघाडी रिसोडच्यावतीने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन केले होते. तृतीयपंथीयांनी टाळ्या वाजवून खड्डयांचा निषेध केला होता. खड्ड्यांना हार घालून, पूजा करुन वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, अशी नारेबाजी यावेळी करण्यात आली होती. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आणि खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार डॉ रवींद्र मोरे पाटील, शहराध्यक्ष प्रदीप खंडारे, तालुका उपाध्यक्ष अर्जुन डोंगरदिवे, पिन्टू मामा ठाकरे, दिलीप चोपडे यांनी स्वत: उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला आहे व होणाऱ्या अपघातापासून सुटका मिळाली आहे.
०००००००००००००००००००००
रिसोड शहरातील रस्त्यांची अवस्था फार बिकट
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. हिंगोली रस्त्याची अवस्था तर खूपच वाईट झाली असल्याने या रस्त्यांची कामे करणे आवश्यक असून, रस्त्यांची कामे न होण्यामागील नेमके कारणही कळण्यास मार्ग नसल्यानेच वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, नव्या रस्ता कामाचे आदेश निघूनही काम चालू होत नसल्याने नागरिकांत रोषाचे वातावरण आहे. त्यामुळे ही कामे लवकर सुरू करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा वंचितचे शहराध्यक्ष प्रदीप खंडारे यांनी दिला आहे.