वाशिम : कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि कुपोषित बालकांवर विशेष पहारा राहावा याकरिता जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागातर्फे १५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान कुपोषित बालकांचा शोध घेतला जाणार आहे. सोबतच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे.
कोविड महामारीच्या साथीमुळे बालकांचे व्यवस्थित स्क्रीनिंग होण्यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन, उंची लसीकरण तसेच तीव्र, अतितीव्र कुपोषित गटातील बालकांची धडक शोध मोहीम आणि किशोरवयीन मुली, गरोदर, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी मोहीम १५ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने हाती घेतली आहे. वाशिम बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने काटा अंगणवाडी केंद्रापासून या मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड, उपसभापती जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी, आरोग्याधिकारी काळे, पर्यवेक्षिका सुळे, धोटे, वानखेडे, विस्तार अधिकारी हातेकर, ब्लॉक व्यवस्थापक शेख, आदी मान्यवर उपस्थित होते. कारंजा प्रकल्पातील कामरगाव येथील अंगणवाडी केंद्रामध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थी व गरोदर, स्तनदा माता, किशोरयीन मुली यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषोच्या सदस्या मीना भोने, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, डॉ. राठोड, डॉ. लकडे, डॉ. चिमणकर व चमूची उपस्थिती होती.
००००
स्त्रीभ्रूण हत्या टाळा; स्त्रीजन्माचे स्वागत करा !
स्त्रीभ्रूण हत्या टाळा आणि स्त्रीजन्माचे स्वागत करा, असा संदेश यावेळी देण्यात आला. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी टोल फ्री नंबरबाबत व अन्य जनजागृतीपर भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रास उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी भेट देऊन पाहणी केली; तसेच या उपक्रमाची माहिती दिली.