वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.गतवर्षी वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यातच मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे जलसाठ्यांनी हिवाळ्यांतच तळ गाठला आणि नागरिकांना पाणीटंचाईची समस्या त्रस्त करू लागली. या समस्येवर नियंत्रणासाठी मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायतच्यावतीने तात्पुरत्या योजनेचे प्रस्ताव जिल्हाप्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर शहरासाठी मालेगाव तालुक्यातील सोनल धरणातून मोतसावंगा धरणात पाणी आणण्यासाठी ४ कोटीची योजना, तर मालेगाव शहरासाठी चाकातिर्थ प्रकल्पातून कुरळाधरणात पाणी आणण्यासाठी १.३७ कोटी रुपयांच्या योजनेचा समावेश आहे. या दोन्ही योजनांना शासनाची मंजुरी मिळाली आणि मालेगावच्या तात्पुरत्या योजनेचे कामही झाले; परंतु धिसाडघाईने केलेले हे काम अंगलट आले. या योजनेत जुन्या पाईपचा वापर करण्यात आल्याने शहरात या योजनेचे पाणी येण्यास मोठा विलंब लागत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे नगर पंचायत महिन्याकाठी १० लाख रुपये खर्चून नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत. तथापि, तात्पुरत्या योजनेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठीही त्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मंगरुळपीर शहराची तात्पुरती योजना वेळेत पूर्ण होण्याची शाश्वती नसल्याने गत महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेला स्थगिती दिली. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आणि मोतसावंगा धरणात पाणीच नसल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला. आता नगर पालिका प्रशासनाने शहराची तहान भागविण्यासाठी १२००० हजार लीटर क्षमतेच्या ९ टँकरने शहरात दरदिवशी पाणी पुरवठा करण्याची योजना आखली असून, यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्याशिवाय पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही लगेचच पाणीटंचाई मिटण्याची शक्यता नसल्याने पालिका प्रशासनाकडून तात्पुरत्या योजनेस वाढीव मुदत मिळविण्याचाही प्रयत्न करीत आहे. त्याशिवाय शहरातील हातपंप दुरुस्तीची मोहिम प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे.
पाणीटंचाई नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:22 PM
वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.
ठळक मुद्देमंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायतच्यावतीने तात्पुरत्या योजनेचे प्रस्ताव जिल्हाप्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. शहराची तहान भागविण्यासाठी १२००० हजार लीटर क्षमतेच्या ९ टँकरने शहरात दरदिवशी पाणी पुरवठा करण्याची योजना आखली. त्याशिवाय शहरातील हातपंप दुरुस्तीची मोहिम प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे.