लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढ झालेली आहे. हा आकडा सध्या १४ हजारांवर पोहोचला असून, उपचार घेणारे रुग्ण दोन हजारांवर आहेत. दरम्यान, सौम्य लक्षणे असणाऱ्या १५०० पेक्षा अधिक रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून, नगर परिषद, ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवून असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. पुढील ८ महिन्यांत, ३१ डिसेंबर २०२० अखेर बाधितांचा एकूण आकडा ६ हजार ६६३ झाला. चालू वर्षी मात्र कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण अत्यंत वेगवान असून, नव्या वर्षातील ८४ दिवसांतच (२५ मार्चअखेर) ७ हजार ३३१ रुग्णांची भर पडून एकूण बाधितांचा आकडा १३ हजार ९९४ वर पोहोचला आहे. त्यापैकी ११ हजार ७९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला; तर २५ मार्चअखेर २०२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ७५ टक्के अर्थात १५०० पेक्षा अधिक रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. तसेच उर्वरित रुग्णांवर शासकीय व खासगी डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल, कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.दरम्यान, गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर ‘वाॅच’ ठेवण्याची जबाबदारी शहरी भागात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय आशा, अंगणवाडी सेविकांनाही याकामी नियुक्त करण्यात आले आहे. ९ ते १४ दिवस गृह विलगीकरणातील व्यक्ती कोणाच्याही संपर्कात येऊ नये, त्यांनी ठरावीक काळात घराबाहेर पडून शहर, गावात फिरू नये यावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष परिश्रम घ्यावे लागत आहेत.
‘ॲक्टिव्ह’ कोरोना रुग्ण प्रथमच दोन हजारांवरजिल्ह्यात कोरोनाचे संकट उद्भवल्याला २६ मार्च रोजी ३५७ दिवस पूर्ण झाले. इतक्या दिवसांत प्रथमच ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांचा आकडा सध्या दोन हजारांवर पोहोचला आहे. यामुळे कोविड हेल्थ केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटलमधील बेड्स हाऊसफुल्ल झाले असून, अनेक रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.