कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्नसमारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. २५ पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापकांना १० हजार किंवा प्रतिव्यक्ती २०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रकमेचा दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील केले जाणार आहे. लग्नसमारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही तसे आढळल्यास नियमांनुसार गुन्हाही दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगरपरिषद, पोलीस प्रशासनानेदेखील मंगल कार्यालय, लॉन, सभागृहांना भेटी देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार नगरपरिषद, पाेलिसांचे पथक मंगल कार्यालय, लॉन, सभागृहांना भेटी देत असून, जिल्ह्यात आतापर्यंत पाच मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींचे मालक, चालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येते.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण मंगल कार्यालय, लॉन, सभागृह - ४०
आतापर्यंत दंडात्मक कारवाई झाली - ५
दंड वसूल केला - ५० हजार रुपये