लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन असून, २३ आॅक्टोबरपर्यंत पाच हजारांपैकी १२८१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना हिवाळ्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या कामासाठी मोफत जेसीबी व पोकलन मशीन उपलब्ध करून देणार आहे तर यासाठी लागणारे डीझेल शासनामार्फत पुरविले जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे दिड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. या अभियानात जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना सहभागी करून घेण्यात असून, जलसंधारणाच्या कामांसाठी गावपातळीवरून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. २३ आॅक्टोबरपर्यंत पाच हजाराच्या आसपास कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, १२८१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांना लवकरच सुरूवात केली जाणार आहे.
जलसंधारणाच्या १२८१ कामांना प्रशासकीय मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:02 PM