लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासंबंधीचे निर्देश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी २३ जुलै रोजी दिले. त्यानुसार, संबंधित प्रशासकांचे बँक खाते आणि पोलिस ‘रेकॉर्ड’संबंधीची पडताळणी केली जात असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात प्रशासकीय मंडळ नियुक्त केले जाणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी मंगळवार, ३० जुलै रोजी दिले.वाशिम बाजार समितीमधील विविध स्वरूपातील गैरप्रकारांचे मुद्दे पावसाळी अधिवेशनात चांगलेच गाजले. दरम्यान, पणनमंत्र्यांच्या निर्देशावरून १ जुलै रोजी बाजार समितीमध्ये कार्यरत पुर्वीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून सहायक निबंधक रमेश अंभोरे यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्र देण्यात आली होती. अशात २३ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांकडे पत्र पाठवून वाशिम कृषी बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ स्थापित करण्याचे निर्देश दिले. त्यात मुख्य प्रशासक म्हणून उकळीपेन येथील संतोष चव्हाण यांचा समावेश असून अन्य प्रशासकांमध्ये विमला इढोळे, शांतीलाल मोदानी, मारोती वाबळे, शिवशंकर भोयर, मदन सावके, सुधाकर बर्वे, रामेश्वर महाले, रेणुका नागरे, नागोराव वाघ, धनाजी सारसकर, रेखा मापारी, कृष्णा महाले, गजानन जाधव, गोविंद चरखा, कैलास गोरे, रवि राऊत, दिलीप काष्टे यांचा समावेश आहे. या सर्व प्रशासकांची नियुक्ती करण्यापूर्वी ते कुठल्याही बँकेचे थकीत कर्जदार नसावेत. त्यानुषंगाने पडताळणी केली जात असून संबंधितांवर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत का, याचीही चाचपणी केली जात आहे. ही प्रक्रिया सद्या अंतीम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन दिवसांत वाशिम बाजार समितीवर प्रशासक मंंडळाची प्रत्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी दिली.
चोख पडताळणीनंतरच नियुक्त होणार प्रशासक मंडळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 4:24 PM