ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सविता ज्ञानेश्वर इढोळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भगवान इढोळे, जि.प. प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक गो.रा. मुंदडा व ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. ग्रामसभेला सुरुवात करताना ग्रामविकास अधिकारी व्ही.के. भगत यांनी गावाच्या विकासाचे विविध स्वरूपाचे ठराव वाचून दाखविले. त्यावर ग्रामस्थांनी गावात विकास फक्त कागदावरच होतो, असे प्रश्न उपस्थित केले. तर सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पडघान यांनी दलित वस्तीतील रस्ते, नाली हे गेल्या २००४-०५ पासून दुर्लक्षित आहेत व अर्ध्या गावाचे सांडपाणी हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या लगतच जात असून रस्ते व नालीचे नव्याने बांधकाम करावे, असे प्रश्न ग्रामसभेत उपस्थित केले. अनेकांनी पांदण रस्ते व विविध स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी व्ही.के. भगत यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. १२ व्यक्तींनी अर्ज दाखल केले. महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड ही गुप्त मतदान पद्धतीने असायला पाहिजे, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केल्याने गोंधळ उडाला. यामुळे ग्रामविकास अधिकारी व्ही.के. भगत यांनी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवडणूक स्थगित केली. तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष कसा असावा, यावर श्रीराम इढोळे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसभेचे सूत्रसंचालन व्ही.के. भगत यांनी केले.
००००००००००००००००
ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त
अडोळी गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. अलीकडच्या काळात अडोळी गावात शांतता नांदत असल्याचे दिसून येते. दरम्यान, ग्रामसभेदरम्यान कोणताही वादविवाद होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.