कृषी विज्ञान केंद्राकडून १६ जून रोजी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ यांच्या विशेष ऑनलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संचालन कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठशास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे तज्ज्ञाद्वारे दिल्या जाणाऱ्या तांत्रिक बाबीचा कपाशीच्या पिकात वापर करून कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. तांत्रिक सत्रात डॉ. अनिल कोल्हे यांनी मुलाखतीमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण करताना गुलाबी बोंड अळीसंदर्भातील पार्श्वभूमी, नुकसानाचा प्रकार, गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र, बोंड अळीच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेअंतर्गत विविध मशागतीय पद्धतीचा सहभाग, शरणागत पट्ट्याचा वापर, मान्सूनपूर्व कपाशीची लागवड टाळणे, फरदड घेणे टाळणे, डोम कळीचा नाश करणे, कामगंध सापळ्यांचा व पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर, ट्रायकोग्रमा मित्र कीटकाचा वापर व आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आधारावर लेबल क्लेम शिफारशीत कीडनाशकांचा गुलाबी बोंडअळी करता संतुलित वापर याविषयी विस्तृत विवेचन केले. राजेश डवरे यांनी गुलाबी बोंड अळी नियंत्रणात येणाऱ्या विविध अडचणी व शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. अनिल कोल्हे यांच्याशी मुलाखत रूपात हितगूज करून विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले. तांत्रिक सत्रात सरतेशेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचेसुद्धा निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगणकतज्ज्ञ श्रीकृष्ण बावस्कर संगणक यांनी केले.
बोंडअळीचा प्रतिबंध, व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अंगिकार करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:28 AM