वाशिम: मुंबईसारख्या मोठ्या शहरात असलेल्या अद्ययावत आणि अत्याधुनिक पार्कच्या धर्तीवर वाशिम शहरातही पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च असलेल्या अॅडव्हेंचर पार्कचे काम वेगात करण्यात येत असून, हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी वाशिम नगर पालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पार्कमध्ये तळागाळातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये अवकाश विज्ञानाची गोडी रुजावी यासाठी ४ के डिजीटल प्लॅनेटोरियमची निर्मिती करण्यात येत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून नावीन्यपूर्ण उपक्रम प्लॅनेटोरियमची निर्मिती व अॅडव्हेंचर पार्कचे काम करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून खगोल विज्ञानाच्या संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा विश्वास नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी व्यक्त केला आहे. प्लॅनेटोरियममध्ये नागरिकांना खगोल दर्शन घडणार असून, ग्रहांची पाहणी करताना आपण प्रत्यक्ष त्याच वातावरणात किंवा ग्रहावर असल्याचा भास होणार आहे.
या अॅडव्हेंचर पार्कमध्ये स्काय ट्रेन, सायकल ट्रॅक, गॅलरी, लहान मुलांसाठी अॅडव्हेंचर्स इक्विपमेंट, अम्युजमेंट पार्क, तुषार, फूड प्लाझा, कल्चरल हॉल आदी अद्ययावत सोयीसुविधा आहेत. या अॅडव्हेंचर पार्कचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या काही महिन्यांतच ते जनसेवेत रुजू करण्याचा विश्वास नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी व्यक्त केला आहे.