लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेसाठी तालुका, ग्राम, समूह साधन व्यक्तींमधून कंत्राटी पदासाठी एकूण ६६ पदे भरावयाची आहेत. त्यानुसार, २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत मानोरा तहसील कार्यालयातील नरेगा कक्षात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे पत्र तहसील कार्यालयास जुलै महिन्यातच प्राप्त झाले; मात्र अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी, ४ ऑगस्टला जाहिरात प्रकाशित करण्यात आली. महसूल विभागाच्या या निष्काळजीपणाचा बेरोजगारांना फटका बसला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या ३० जुलै रोजीच्या पत्रानुसार तालुक्यातील तहसीलदारांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया २ ते २९ ऑगस्ट या कालावधीत राबवावयाची आहे. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर पदे भरण्यात येणार असून ६६ जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत नरेगा कक्षात अर्ज स्वीकारावे, असे पत्र वरिष्ठांकडून तहसीलदार कार्यालयास जुलै महिन्यात पाठविण्यात आले. तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना माहिती कळावी, यासाठी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डवर जाहिरात लावून दवंडीद्वारे गावात प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचना होत्या, मात्र जाहिरात विलंबाने प्रकाशित झाल्याने मूळ उद्देश असफल झाला आहे. सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया राबविण्याकरिता कंत्राटी तत्त्वावर पदे भरल्या जाणार आहेत. त्यासाठी २ ऑगस्टपूर्वीच जाहिरात प्रकाशित व्हायला हवी होती; मात्र महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्यास विलंब झाला असून बेरोजगारांना फटका बसला आहे.- प्रदिप देशमुख, ग्रा.पं. सदस्य, कारखेडा
सदर जाहिरातीचे पत्र ४ ऑगस्ट रोजी दुपारी १.१३ वाजता आपणास प्राप्त झाले. साधारणतः १.४५ वाजता ते कारखेडा ग्रामपंचायत कार्यालयाकडे प्रसिद्धीसाठी दिले.- सागर चौधरी, तलाठी, कारखेडा