५ मे रोजी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राला मिळालेली कोव्हॅक्सिन लस आरोग्य केंद्रात पोहोचण्यापूर्वीच माघारी बोलविली. जवळपास आठवडाभरापासून शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत ६,२७२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. देशात १ मेपासून १८ वर्षापासून पुढील नागरिकांच्या लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत मात्र लसीच्या तुटवड्याअभावी ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचीही लसीकरण रखडले आहे. अशातच बुधवार ५ मे रोजी लस उपलब्ध होणार म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका वाशिम येथे बोलविण्यात आली. काही प्रमाणात शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी लस पुरवठासुद्धा कण्यात आला. मात्र रुग्णवाहिका शिरपूरला लस घेऊन पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातूनच रुग्णवाहिका माघारी बोलविण्यात आली. सदर लसीचा साठा ग्रामीण रुग्णालयालाच पुरविण्यात आला असल्याची माहिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला लस पुरवठा होत नसल्याने आता खेडे व ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.
शिरपूर येथील लसीकरण प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:43 AM