वाशिम : तालुका आराेग्य अधिकारी व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने व माहिती नागरिकांना मिळत नसल्याने शासनाची घराेघरी जाऊन लसीकरण करणे या याेजनेची काटेकाेरपणे अंमलबजावणी हाेत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी नगरसेवक ॲॅड. विनाेद खंडेलवाल यांनी जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने लसीकरण कार्यक्रमाची प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्याकरिता तालुका अधिकारी, कर्मचारी व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुका केल्या आहेत. परंतु असे लक्षात येत आहे की फक्त शासनाची याेजना आहे त्याची अंमलबजावणी करावयाची आहे त्या दृष्टीकाेनातून फक्त औपचारिकता म्हणून राबविण्यात येत आहे. आराेग्य विभाग व नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. मुख्याधिकारी व तालुका आराेग्य अधिकारी यांनी कार्यक्रम राबविण्यापूर्वी काेणतेही नगरसेवक किंवा लाेकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. याकरिता आयाेजित सभेतही काेणास निमंत्रित केले नाही. केवळ औपचारिकता म्हणून सर्व कार्यक्रम राबविले आहेत. तरी नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी खंडेलवाल यांनी केली आहे.