वाशिम : जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. ४० दिवसानंतर पहिल्यांदाच पॉझिटिव्हीटी रेट ७.१४ टक्क्यावर आला आहे.
कोरोना विषाणू संसर्गात वाढ झाल्याने जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या. यामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, कोरोना बाधिताच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करणे यासह कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सामुहिक प्रयत्न व त्याला नागरिकांचे सहकार्य मिळाल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट घटला असून गेल्या पाच दिवसांपासून हे प्रमाण एक अंकी संख्येत आहे. जिल्ह्यात रोज सुमारे ३५०० ते ४००० कोरोना चाचण्या करून अधिकाधिक कोरोना बाधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिह्यात ९ मे पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी फिल्डवर जावून तसेच आढावा बैठकांच्या माध्यमातून सातत्याने उपाययोजनांचा आढावा घेतला. सामुहिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख कमी होताना दिसून येत आहे. पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टंन्सिगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.