वाशिम शहरातील अकाेला रस्त्यावर शहराची सुरुवात हाेत असलेल्या पाटीलनगर, वाटाणेवाडी परिसरात शेकडाे कुटुंबे वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांपासून या भागात ना रस्ते, ना पथदिवे, ना नाल्या बनविण्यात आल्या. मात्र गत वर्षात या भागातील जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले असून नुकतेच पथदिवे लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या भागाचे नगरसेवक अतुल वाटाणे यांनी नगर परिषदेकडे पाठपुरावा करीत या भागात रस्ते व पथदिव्यांची व्यवस्था केली. तब्बल ४० वर्षांपर्यंत या भागाकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. मात्र प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवक अतुल वाटाणे यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्राधान्य दिल्याने नागरिकांनी त्यांचा सत्कार कार्यक्रमही आयाेजित केला आहे.
................
पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
तब्बल ४० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या वाटाणेवाडी, पाटीलनगर भागात रस्ते, पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषदेची पाणीपुरवठा याेजनाही पाटीलनगराच्या काही भागांत पाेहोचली आहे. मात्र, दत्तनगरातील काही भागांत अद्याप पाणी पाेहोचले नसल्याने या भागातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे. तसेच नागरिकांनी या विषयावर वाटाणे यांच्याशी चर्चाही केली.
............
लवकरच पाणीपुरवठा
माझ्या वॉर्डातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने साेडविणे माझे कर्तव्य आहे. अनेक वर्षांपासून या भागाचा विकास खुंटला हाेता, ताे आता सुरू झाला आहे. लवकरच या भागात पिण्याचे पाणीही पाेहोचविणार असल्याचे नगरसेवक अतुल वाटाणे यांनी सांगितले