लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून यंदा प्रत्येकी दोन हजार रुपये असा एकूण ४१ लाखांचा निधी शासनाकडून जिल्हा परिषदेला दिवाळीनंतर मिळाला. हा निधी आता १०११ अंगणवाडी सेविका, ६५ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९९४ मदतनिसांना दिला जात आहे. दरवर्षी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाकडून दिवाळीदरम्यान भाऊबीज भेट दिली जाते. यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निणर्य शासनाने घेतला. कोरोना काळात बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येइल असे महिला व बालविकास विभागातर्फे सांगण्यात येत होते. परंतू, शासनाकडून निधी वेळेवर मिळाला नसल्याने ही भाऊबीज भेटही दिवाळीनंतर मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी आहेत. येथे कार्यरत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी जिल्हास्तरावरून तालुकास्तरीय सहा प्रकल्प कार्यालयांना ४१ लाखाचा निधी वितरीत करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
दिवाळी झाल्यानंतर जिल्ह्यातील १०११ अंगणवाडी सेविकांना ‘भाऊबीज’ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 4:06 PM