वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या रुग्णावर उपचार सुरू असताना दुसरा रुग्णच आढळून आला नव्हता, परंतु मे २०२० पासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागले आणि पहिल्या लाटेत जिल्ह्यात ७८०० च्या जवळपास कोरोना रुग्ण झाले. त्यापैकी १६३ व्यक्तींचा मृत्यूही झाला, तर दुसऱ्या लाटेत ३४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. मार्च २०२१ ते मे २०२१ पर्यंत दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले. दुसऱ्या लाटेत ४२४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून दुसरी लाट ओसरू लागली. आता कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. दर दिवसाला सरासरी एक दाेनच रुग्ण आढळून येत आहेत. त्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत जाऊन आता केवळ ८ जण उपचाराखाली उरले आहेत.
००००००००००००००००००००००
धोका अद्याप संपला नाही
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नगण्य असले तरी कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यात तिसऱ्या लाटेचे सावट कायमच असून, नागरिकांनी दक्षता न बाळगल्यास कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढायला वेळ लागणार नाही. नागरिकांनी नियमित मास्क वापरून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
००००००००००००००००००००००
दर दिवशी चाचण्या सुरूच राहणार
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात येऊन आता केवळ ८ जण उपचाराखाली उरले असले तरी कोरोना नियंत्रणाच्या उपाय योजनांत ढील दिली जाणार नाही. पूर्वीप्रमाणेच दर दिवशी १००० ते १२०० व्यक्तींची कोरोना चाचणी नियमितपणे केली जाणार आहे. गावागावांत आवश्यकतेनुसार कोरोना चाचणी शिबिरांचेही आयोजन केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
००००००००००००००००००००००
कोट: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे, परंतु कोरोनाचा धोका अद्याप दूर झालेला नाही. नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे व मास्क नियमित वापरावा.
-डॉ. मधुकर राठोड.
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
००००००००००००००००००००००
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण बाधित – ४१७१०
ॲक्टिव्ह – ८
कोराेनामुक्त झालेले– ४१०६३
मृत्यू – ६३८