वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणात असतानाच आणखी एका विषाणूने तोंड वर काढल्याचे ऐकायला मिळाले असून, देशात झिका विषाणूचे रुग्ण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप महाराष्ट्रात या विषाणूचे रुग्ण आढळल्याची माहिती नसली तरी आरोग्य विभाग सतर्क झाला असून, एका विशिष्ट जातीच्या डासांमुळे पसरणाऱ्या विषाणूवर नियंत्रणासाठी फवारणीच्या सूचना दिल्या जात आहेत.
झिका या विषाणूचा पहिला रुग्ण केरळमध्ये मिळाला आहे. यामुळे आणखी चिंतेत भर पडली आहे. गर्भवती महिलांना या विषाणूचा अधिक धोका असून, केरळमध्ये एक २४ वर्षीय गर्भवती महिला झिका विषाणूने बाधित झाली असल्याचे, तसेच तिरुअनंतपुरममधून झिका विषाणूचे आणखी १३ संशयित रुग्ण असल्याची माहिती आहे. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन त्या नमुन्यांची चाचणी पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी'मध्ये केली जात आहे. झिका व्हायरसला बळी पडलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. पाचपैकी एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू होतो. किरकोळ ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी अशा प्रकारची लक्षणे विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिसतात. प्रत्यक्षात खूपच कमी प्रमाणात होणाऱ्या नर्व्हस सिस्टीमचा हा एक आजार मानला जातो. तज्ज्ञ या प्रकाराला गुलीयन बार सिंड्रोम असेही म्हणतात. या कारणामुळे लकवासुद्धा येऊ शकतो. आजघडीला झिका व्हायरसवर कोणताच उपचार निश्चित नाही.
----------
१) कशामुळे होतो? (बॉक्स)
झिका विषाणू ‘फ्लॅव्हिव्हिरिडे’ या वर्गातील एक विषाणू आहे. ‘ए-एजिप्टी आणि ए अल्बोपिक्टस’सारख्या दिवसा सक्रिय एडिस डासांद्वारे हा पसरतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो.
-----------
बॉक्स: झिका व्हायरसची लक्षणे
१) झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे
२) अंग दुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे
३) प्रचंड डोकेदुखी
४) डोळे लाल होणे
५) अशक्तपणा आणि थकवा
------------------
बॉक्स : उपाययोजना काय?
झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट औषध नाही आहे. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे. झिका व्हायरसमध्ये सांधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही.
----------------
कोट: झिका व्हायरसचे रुग्ण देशात आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून सर्व जिल्ह्यांना देण्यात आला आहे. ‘ए-एजिप्टी आणि ए अल्बोपिक्टस’सारख्या दिवसा सक्रिय एडिस डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूवर नियंत्रणासाठी जिल्हाभरात फवारणी केली जाणार आहे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
---------