वाशिम : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद २ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातही उमटले. स्थानिक जिजाऊ चौक (पोस्ट ऑफिस चौक) येथे दुपारी ३:१५ वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने अकोला-नांदेड महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू होते. आंदोलनादरम्यान १ सप्टेंबर रोजी आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्याने यात अनेकजण गंभीर जखमी झाले. या आंदोलनामुळे मराठा समाजात असंतोषाची लाट निर्माण झाली असून, राज्यात अनेक ठिकाणी याचे तिव्र पडसाद उमटत आहेत. वाशिम जिल्ह्यातही शनिवारी (दि.२) मराठा समर्थकांनी रस्त्यावर उतरुन घटनेचा निषेध केला. अकोला-नांदेड महामार्गावर जिजाऊ चौक (पोस्ट ऑफिस चौक) येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. रास्ता रोको आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक प्रभावित झाली होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.