कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीचा सुधारित आदेश १८ एप्रिलला जारी केला असून, त्यानुसार दवाखाने, मेडिकल्स वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचा आदेश जारी केल्यानंतर सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असणारी अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना सोमवारी दुपारी १ वाजता बंद झाल्या. त्यानंतर मेडिकल व दवाखाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद झाली होती. विशेष म्हणजे येथील पोलीस चौकीचे सर्व कर्मचारी वनोजा चेकपोस्टवर तैनात करण्यात आले आहेत. दोन वाहतूक कर्मचाऱ्यांपैकी एका जमादाराला पोहरादेवी येथे पाठविण्यात आल्यानंतर शेलूबाजार बाजारपेठेची जबाबदारी केवळ एकाच वाहतूक पोलिसाच्या भरवशावर असताना व्यापारी वर्गाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत दिलेल्या वेळेत आपल्या आस्थापना बंद केल्या. अकोला ते मंगरूळपीर मार्गावरील वाहतूक मंदावली, तर नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गावर वाहतूक जोरात सुरू असल्याचे दिसून आले.
शेलूबाजार बाजारपेठेत दुपारनंतर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:42 AM