मंगरुळपीर: तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेली विविध रस्त्यांच्या दुरुस्ती, डागडुजीची कामे अत्यंत निकृष्ट झाली असून, या कामांसाठी खर्च केलेला निधी व्यर्थ ठरल्याचा आरोप मंगरुळपीर येथील भाजपचे नगरसेवक अनिल गांवडे यांनी केला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांकडे तक्रार करून संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासह त्याची दखल न घेतल्यास मोठा खड्डा खोदून त्यात समाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मंगरुळपीर तालुक्यात गेल्या दोन वर्षांत वाशिम-मंगरुळपीर, मंगरुळपीर-कारंजा, मंगरुळपीर-अकोला या प्रमुख जिल्हा मार्गासह गणेशपूर-तºहाळा, वनोजा-पिंजर, पोटी फाटा-धामणी, कंझरा-पिंप्री, शेलूबाजार-वाशिम, धानोरा-अनसिंग, धानोरा-पोहरादेवी आदि रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी व खड्डे भरण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहेत. ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून, शासनाने या कामांसाठी दिलेल्या निधीचा अपव्ययच झाल्याचा आरोप अनिल गावंडे यांनी केला आहे. अद्यापही या रस्त्यांची अवस्था वाईट असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे कायमच आहेत. त्यामुळे या कामांची चौकशी करून संबंधित अभियंता, कंत्राटदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अनिल गांवडे यांची मागणी असून, त्याची दखल न घेतल्यास मोठा खड्डा खोदून त्यात समाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.