वाशिम: शहरातील सिव्हील लाईन परिसरातील राजे उदाराम कॉलनीमधील रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्यामुळे या कामाची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी संध्या लक्ष्मण आढाव या वृद्ध महिलेने चार दिवसांपासून उपोषण सुरू केले असून, याची अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही. शहरातील सिव्हील लाईन परिसरात संध्या आढाव यांच्या राजे उदाराम कॉलनीमधील प्लॉट क्रमांक ६२ मधील घराच्या उत्तरेकडून जय अम्बे शॉपी ते अशोक खडसे यांच्या घरापर्यंत टायर रस्त्याचे काम करण्यात येत आहे. अंदाज पत्रकानुसार सदर रस्त्याची रुंदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ६० फुट आहे. त्यानुसार रस्त्याचे काम होणे अपेक्षीत आहे; परंतु या रस्त्याच्या दरम्यान काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्र मण हटवून रस्त्याचे काम करणे आवश्यक असताना रस्त्यावरील अतिक्रमण वाचवून आणि रुंदी कमी करून करण्यात येत आहे. या संदर्भात संध्या आढाव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही दिली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव बुधवार २१ जूनपासून सदर रस्त्यावरच उपोषण सुरू केले. या उपोषणाला शनिवार २४ जून रोजी चार दिवस झाले तरी, कोणत्याही अधिकाऱ्याने सदर उपोषणाची दखल घेऊन उपोषण मंडपाला भेट दिली नाही किंवा संध्या आढाव यांच्या तक्रारीनुसार चौकशी सुरू केली नाही.
रस्त्याच्या कामासाठी चार दिवसांपासून वृद्ध महिलेचे उपोषण
By admin | Published: June 24, 2017 1:27 PM