संतोष वानखडे
वाशिम : श्रीक्षेत्र पोहरादेवी परिसरातील पीकनुकसान भरपाइ, घरकुल, निराधार योजना यांसह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रमेश महाराज यांनी २६ जून रोजी पोहरादेवी येथील नळ पाणी पुरवठा टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. याची दखल घेत लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी व परिसरातील वन्यप्राणी पिके फस्त करीत असल्याने पिकांची नुकसान भरपाई व शेताला कंपाउंड करून देण्यात यावे, घरकुलचा लाभ देण्यात यावा, राजपूत समाजातील भामटा शब्द वगळू नये व निराधार योजनेची बंद झालेली पेन्शन सुरु करावी याबाबत रमेश महाराज यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना १५ दिवसांपूर्वी निवेदन पाठवून मागण्या मान्य न झाल्यास २६ जूनला शोले आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. मागण्या मान्य न झाल्याने रमेश महाराज हे परिसरातील शेतकरी, महिला समर्थकांसह २६ जूनला सकाळी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत शोले स्टाईल आंदोलनकरिता पाण्याचे टाकीवर चढले.
आंदोलनाला सुरवात करताच नायब तहसीलदार जी. एम. राठोड यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे लेखी आश्वासन दिले. निराधार योजनेचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात येईल असे सांगितल्याने तुर्तास आंदोलन स्थगित केले. आठ दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास यापुढे आंदोलनाची दिशा ठरवू असे महाराज म्हणाले. यावेळी आंदोलनात पोहरादेवी व परिसरातील शेतकरी व निराधार योजनेतील महिला उपस्थित होत्या.