वाशिम: गेल्या चार दिवसापासून तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे वाशिम तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले असून, त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनाचा आशय असा की, गेल्या तीन ते चार दिवसांत वाशिम तालुक्यात जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस, आंबा, हरभरा, भाजीपाला, गहू, संत्रा आदि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता शेतकºयांना कृषी उत्पादनातून कोणतीच आशा उरली नसून, उदरनिर्वाहाची कोणतीच सोय नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामा करण्यासह तातडीने अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. या प्रक्रियेला विलंब झाल्यास शेतकरी निराश होवून आत्महत्येचा मार्ग पत्करण्याची भिती व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात घेत नुकसानग्रस्त पिके व घराचे पंचनामे करुन त्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. तहसिलदारांना निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, तालुका सचिव विजय खानझोडे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, उपतालुकाप्रमुख गजानन इढोळे आदींची उपस्थिती होती.