वाशिम : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याचे पडसाद वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातही उमटले आहेत. मोठेगाव, शेलगाव राजगुरे व करडा अशा तीन गावांत पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
रिसोड तालुक्यामध्येही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. सुरुवातीला मोठेगाव या गावात नेत्यांना गावबंदी केल्याचे फलक झळकले. आमदार, खासदार व पुढाऱ्यांना गावात प्रवेश नसल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. त्यानंतर शेलगाव राजगुरे येथेही पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. आता शनिवारी (दि.२८) करडा येथे पुढाऱ्यांना गावबंदी केली असून, विनाकारण आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नये, असे फलक लावण्यात आले.
करडा गावाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून, सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी नेत्यांना गावबंदी केल्याने व आक्रमक भूमिका घेतल्याने आरक्षण आंदोलन चर्चेत आले आहे. गावबंदीच्या फलकामुळे लोकप्रतिनिधींची कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात नेत्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.