दिनेश पठाडे, वाशिम : रेशनकार्डची दुय्यम प्रत देण्यासाठी लिपिकाने लाच घेण्यास आधी होकार दिला. मात्र, प्रत्यक्ष लाच घेताना ट्रॅपचा संशय येताच तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी एसीबीने लिपिक प्रभाकर बोरकर यास ताब्यात घेतले. रिसोड तहसील कार्यालय परिसरात एसीबीने मंगळवारी(दि.५) ही कार्यवाही केली.
तक्रारदारांचे आईच्या नावे असलेल्या रेशनकार्डची दुय्यम प्रत देण्यासाठी रिसोड तालुका पुरवठा विभागाकडे अर्ज दाखल केला होता. दुय्यम प्रत देण्यासाठी पुरवठा विभागील लिपिक प्रभाकर बोरकर याने अर्जदाराकडे पाचशे रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तक्रारीच्या अनुषंगाने वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. मात्र, लिपिक बोरकर यांना तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारली नाही. लाच स्वीकारली नसली तरी लिपिकांकडे असलेले शासकीय काम करून देण्यासाठी तक्रारदारांकडे लाच मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने लिपिक प्रभाकर बोरकर यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकारणी रिसोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी दिली. सापळा कार्यवाही एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके, विनोद मार्कंडे, विनोद अवगळे, योगेश खोटे, आसिफ शेख, रवींद्र घरत, मिलिंद चन्नकेशला यांनी केली.