उंबर्डा बाजार : उंबर्डा बाजारचा प्रभार असणाऱ्या कृषी सहायकाकडे इतर अठरा गावांचा प्रभार असल्याने शेतकरी वर्गाला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. कायमस्वरुपी कृषी सहायक देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.
उंबर्डा बाजारचे कृषी सहायक सचिन उदयकार यांना कृषी पर्यवेक्षक या पदावर बढती मिळाल्याने रिक्त झालेल्या जागेचा प्रभार कृषी सहायक सूरज इंगोले यांना देण्यात आला आहे. कृषी सहायक इंगोले यांच्याकडे आधीच पिंपळगाव खु! , दादगाव, माळेगाव, मोहळ, ममदाबाद, पिम्परी फाॅरेस्ट, एकलारा, कामठवाडा, रामनगर, झोलगाव, जनुनासह दिघी या बारा गावांचे काम पाहतात. त्यातच उंबर्डा बाजाचे कृषी सहायक पद रिक्त झाल्याने उंबर्डा बाजारसह बागापूर, पिम्परी वरघट, वहीतखेड, सोमठाणा, रापेरी आदी सहा गावांचा प्रभारसुध्दा इंगोले यांच्याकडेच जोडण्यात आल्याने एकूण अठरा गावांचा कारभार पाहण्याची वेळ केवळ एकट्या कृषी सहायकावर येऊन ठेपली आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे उंबर्डा बाजारचा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेत समावेश असल्याने शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र प्रभार असणा-या कृषी सहायकाची आवश्यकता असतानासुध्दा कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळे आधीच बारा गावांचा कारभार पाहणा-या कृषी सहायकाकडे उंबर्डा बाजारचा पदभार सोपविण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. तरी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गानी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ शेतकरी वर्गातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी उंबर्डा बाजारला कायमस्वरुपी स्वतंत्र प्रभार असणाऱ्या कृषी सहायकाची नेमणूक करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे.
.....
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला ३६ कृषी सहायकांच्या जागांची मान्यता आहे. यापैकी केवळ २३ कृषी सहायक कार्यरत असून, १६ कृषी सहायकांची पदे रिक्त आहेत. त्यातच यावर्षी काही कृषी सहायकांना बढतीसुध्दा मिळाली आहे. कृषी सहायकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्याबाबत वरिष्ठांना लेखी कळविण्यात आले आहे.
- संतोष वाळके,
तालुका कृषी अधिकारी, कारंजा लाड