वाशिम : कोटेशन भरूनही शेतकऱ्यांना कृषीपंप जोडणी मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत प्रलंबित कृषीपंप जोडण्या तातडीने निकाली काढा अन्यथा जिल्हाभरात आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी (दि.९) दिला.
शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी कृषीपंप जोडणी मिळणे आवश्यक आहे. कृषीपंप जोडणी मिळावी याकरीता जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोटेशनही भरले. परंतू, कृषीपंप जोडणी मिळण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कवर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी वाशिम येथील महावितरण कार्यालयात धडक देत अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांच्याशी चर्चा केली. कोटेशन भरूनही कृषीपंप जोडण्या प्रलंबित राहत असल्याने शेतकऱ्यांनी सिंचन कसे करावे, कृषीपंप जोडणीस विलंब करणाऱ्या कंत्राटदाराला यापुढे कंत्राट देऊ नये, रब्बी हंगामात जळालेले विद्युत रोहित्र तातडीने बदलून द्यावे, गावठाण व शेतीपंपाचे नादुरूस्त डीपी बाॅक्स बदलून द्यावे, अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यामुळे जमिनदोस्त झालेले किंवा नादुरूस्त असलेले विद्युत खांब बदलून द्यावे आदी प्रश्नांची सरबत्ती डॉ. कवर यांनी केली.
याप्रसंगी माजी सभापती विश्वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख डॉ.चंद्रशेखर देशमुख, अशोकराव अंभोरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख गणेशअन्ना देशमुख, रिसोड तालुकाप्रमुख नारायणराव आरू, सहकार सेना जिल्हाप्रमुख बंडूभाऊ शिंदे, डॉ.गजानन सानप, हेमंत घोडे यांच्यासह शिवसैनिक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.