लोेकमत न्यूज नेटवर्क ।रिसोड: तालुक्यातील ग्राम करडा येथील ग्रामीण कृषी कार्यानुुभव कार्यक्रमांतर्गत हळद पिक बीजप्रक्रिया आणि हळद लागवड तंत्रज्ञान मोहीम हाती घेऊन कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी २९ जुन रोजी उत्कृष्टपणे ग्राम करडा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सुविदे फाउंडेशन संलग्नित कृषी महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थिनींसाठी ग्राम करडा येथे २९ जुन रोजी हळद सुधारित बेणे लागवड आणि लागवड पूर्वी बीजप्रक्रिया किती महत्वाची आहे, याचे सादरीकरण प्रात्यक्षिकाद्वारे करण्याबाबत ग्राम करडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करडा येथील प्रगतशील शेतकरी विजयराव देशमुख, भगवानराव देशमुख आणि बाळासाहेब देशमुख यांच्या शेतावर हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी हळद बीज प्रक्रिया आणि लागवडीचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच या प्रक्रियेचे महत्व, एकात्मिक पिक संरक्षण आणि बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण करता येईल, याबाबत त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना मोलाचे मार्गदर्शनही केले. या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयातील कृषी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी सिंधू गव्हाणे, प्रगती गावंडे, पुनम फुरंगे यांनी परिश्रम घेतले. यासाठी त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी जी. देव्हडे, ग्रामीण कृषी कायार्नुभव कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. व्ही. डी. मेटांगळे, प्रा. डी. डी. मसूडकर व इतर शिक्षकवृंद आणि समस्त शेतकरी बांधवांचे सहकार्य लाभले.
कृषिकन्यांनी राबविली बीजप्रक्रिया, लागवड प्रात्यक्षिक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 4:27 PM